नाशिक – पैश्यांच्या देवाण घेवाणीतून एकाचे अपहरण करणाऱ्या तीघांना पोलीसांनी अटक केली. ही कारवाई ठाणे जिह्यातील कल्याण फाटा भागात करण्यात आली. संशयीतांच्या ताब्यातून अपहृत इसमाची सुटका करीत पोलीसांनी गुह्यात वापरलेली कारसह मोबाईल असा सुमारे ४ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, जगन्नाथ विठ्ठल सदगीर (३९ रा.मोहदरी ता.सिन्नर), सिलवेटर लुईस बागुल (३६ रा.चेहडी शिव नाशिकरोड) व भरत पोपट गिते (३६ रा.गितेमळा, सिन्नर फाटा) अशी अटक केलेल्या अपहरणकर्त्यांची नावे आहेत. चेहडी जकात नाका भागातील रविंद्र पंढरीनाथ सोनवणे (४६ रा.साईदर्शन अपा.चेहडी) यांचे आर्थिक कारणातून अपहरण करण्यात आले होते.
आडगाव पोलीस ठाणे हद्दीत स्विफ्ट कारमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी त्याना पळवून नेले होते. पत्नी उज्वला सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आडगाव पोलीसांसह शहर गुन्हे शाखेची पथके अपहरणकर्त्यांचा माग काढत असतांना युनिट १ चे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.
अपहरणकर्त्यांनी ठाणे जिह्यातील कल्याण फाटा नजीकच्या कोणगाव शिवारात असलेल्या हॉटेल जय मल्हार येथे एकास डांबून ठेवल्याची माहिती खबऱ्याने दिल्याने पोलीस पथके रवाना झाले होते. पथकाने हॉटेल गाठले असता संशयीत व अपहृत इसम कारमधून ठिकाण बदलण्याच्या प्रयत्नात मिळून आले. पोलीसांनी अपहृत सोनवणे यांची सुटका करीत तीघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून मोबाईल आणि गुह्यात वापरलेली कार असा सुमारे ४ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयीतांना तपासकामी आडगाव पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.