नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चार जणांच्या टोळक्याने प्लॉट बघण्याच्या बहाण्याने घेवून जात एकाचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. गोपाळ जगन्नाथ पाटील (५१ रा.शिंदे मळा, भाजी मार्केट अशोकनगर) असे अपहृत व्यक्तीचे नाव आहे. आर्थिक देवाण घेवाणीतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात असून, याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटील हे जमीन व प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. रविवारी (दि.२१) ते घरी असतांना चारचाकीतून आलेल्या अनोळखी चार जणांनी त्यांना श्रमिकनगर भागात प्लॉट असून तो बघण्याचा आग्रह धरला. त्यामुळे पाटील त्याच्या समवेत गेले असता ही घटना घडली.
पाटील अद्याप घरी परतले नसून त्यांचे काही तरी कारणासाठी संबधितांनी अपहरण केल्याचा आरोप मुलगा शुभम पाटील यांनी केला आहे. याबाबत शुभम पाटील यांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक कातकाडे करीत आहेत.