नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्योजकास प्रोसेसींग फीच्या नावाखाली साडे दहा लाखास गंडा घातल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .कारखान्याच्या व्यवसायासाठी दिर्घ मुदतीचे कर्ज काढून देण्याचे सांगत ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शुल्केश्वर बजाबा वर्पे (रा.समर्थ नगर, इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज वामन शिंदे (४५), सर्वेश मनोज शिंदे (३५ रा.दोघे ऋषीकेश हाईटस, महात्मानगर), युवराज हरिशंकर वर्मा व सरताज मिर्झा (रा.क्षितीज अपा.अंधेरी स्पोर्ट क्लब, मिरा भाईंदर रोड, अंधेरी वेस्ट मुंबई) अशी उद्योजकास गंडा घालणा-या संशयितांची नावे आहेत. वर्पे उद्योजक असून त्यांचा औद्योगीक वसाहतीत कारखाना आहे. कंपनीच्या व्यावसायीक वृद्दीसाठी ते मार्च २०२१ मध्ये बँक ऑफ बडोदाच्या इंदिरानगर शाखा भागात गेले असता ही घटना घडली.
शिंदे बापलेकाने त्यांना गाठून कंपनीच्या कामासाठी पाच कोटी रूपयांचे कमी व्याजदराचे आणि दिर्घ मुदतीचे कर्ज काढून देतो अशी बतावणी करीत हा गंडा घातला. यावेळी मुंबईस्थित दोघा संशयितांशी संपर्क करून दिल्याने वर्पे यांचा विश्वास बसला. यानंतर संशयितांनी प्रोसेसिंग फीच्या नावाखाली वर्पे यांच्याकडून सुमारे साडे दहा लाख रूपये स्विकारले.
अनेक दिवस उलटूनही कर्ज अथवा पैसे परत न केल्याने वर्पे यांनी संशयिताकडे तगादा लावला असता विश्वासघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी पोलिसात धाव घेतली असून,अधिक तपास सहाय्यक निरीक्षक राजपूत करीत आहेत.