नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अपघाताचा बनाव करून पत्नीचा मृत्यू झाल्याचा दावा करणा-या मामा भाच्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मच्छींद्र भगवान चौरे (४०) व सुरेश तुळशीराम कराड (१९ मुळ रा. दोघे नागझरी जि. बीड. हल्ली मु. संतकृपा अपार्टमेंट, महाराष्ट्र बँकेसमोर, श्रीरामनगर, जत्रा हॉटेल जवळ, नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. चारित्र्याच्या संशयातून तिच्या डोक्यात लोखंडी मुसळ घालून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपास निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती अशी की, नंदा मच्छींद्रनाथ चौरे (३५ रा.संतकृपा अपा.श्रीरामनगर) या बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास परिसरातील महाराष्ट्र बँकेपाठीमागील रस्त्याने पायी जात असतांना अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला होता. एम.के.बिअर शॉप समोरून त्या पायी जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. पतीने त्यांना नजिकच्या लोकमान्य हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.ओमकार गवळी यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
अखेर गुन्ह्याची कबुली
शवविच्छेदन अहवालात महिलेच्या डोक्यात वजनी वस्तू मारल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला असता संशयिताचे पितळ उघडे पडले. मामा भाच्याच्या वेगवेगळय़ा चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चारित्र्याच्या संशयातून महिलेच्या डोक्यात लोखंडी मुसळ मारण्यात आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. जत्रा हॉटेल परिसरातील श्रीराम नगर येथील संतकृपा निवासी इमारत येथे हा प्रकार घडला. चौरे दांम्पत्यात सकाळी वाद झाला. या वादात चारित्र्याचा संशय घेण्यात आल्याने संतप्त मच्छींद्र चौरेने तिच्या डोक्यात जवळच पडलेली लोखंडी मुसळ उचलून आपल्या पत्नीच्या डोक्यात हाणली.
अपघाताचा बनाव
या घटनेत महिला गंभीर जखमी झाल्याने भेदरलेल्या मामा भाच्याने रक्तबंबाळ अवस्थेत तिला खासगी रूग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय सुत्रांनी तिला मृत घोषीत केले. यावेळी संशयितांनी अपघाताचा बनाव रचत पोलिसांना खोटी माहिती दिली. मात्र शवविच्छेदनानंतर त्यांच्या पापाचा घडा भरला. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास उपनिरीक्षक सुभाष जाधव करीत आहेत.