नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयतातून पत्नीने पतीचा खून केल्याची घटना पाथर्डी फाटा येथील यशवंतनगर परिसरातील एका आपार्टमेंट मध्ये घडली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीने आपल्या मुलाच्या मदतीने हा सर्व प्रकार केला आहे. थेट पतीच्या डोक्यात मुसळी मारून पत्नीने पतीची हत्या केली आहे. याप्रकरणी पत्नी व मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. दादाजी गवळी (४१, समृद्धी प्लाझा, यशवंतनगर दामोदर चौक, पाथर्डी फाटा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत संशयित पत्नी सुनीता गवळी व मुलगा विशाल गवळी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंध असल्याच्या संशयतातून रविवारी रात्री पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर पत्नी संतप्त झाली. तिच्या डोक्यात प्रचंड राग धुमसत होता. त्यानंतर पती दादाजी हा झोपी गेला. संशयित पत्नी सुनीता पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास झोपेतून उठली. तिने मुलगा विशाललाही झोपेतून उठवले. पती दादाजी झोपेतच होता. मुलगा विशालच्या मदतीने पत्नी सुनीता हिने दादाजी यांच्या डोक्यात मुसळीने मारली आणि त्याचा खून केला. या घटनेची माहिती पोलिसांना सकाळी सात वाजेच्या सुमारासा मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, सहायक पोलीस निरीक्षक शंकर सिंह राजपूत, उपनिरीक्षक मनीषा शिंदे यांच्यासह सह गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अनैतिक संबंधांचा संशय
गवळी हे अंबड येथील कंपनीत कामाला होते. नात्यातीलच महिलेशी दादाजी यांचे अनैतिक संबंध असल्याचे पत्नी सुनीता हिला समजले होते. त्यामुळे सुमारे आठ महिन्यापूर्वीच पिंपळनेर पोलिस ठाण्यात त्यांचा वाद गेला होता. पुन्हा असे घडणार नाही, असे आश्वासन त्यावेळी दादाजी यांनी दिले होते. तसेच, दादाजी आणि पत्नी सुनीता यांच्यात समझोता झाला होता. परंतु पुन्हा गवळी त्या महिलेशी अनैतिक संबंध सुरूच ठेवल्याचा प्रकार पत्नी सुनीता हिला समजला. तसेच गवळी घरात पैसे देत नसल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाले होते.