नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी फाटा परिसरात चहा आणि सिगारेटचे पैसे मागीतल्याच्या रागातून दोघांनी उकळता चहा व दुकानातील माल रस्त्यावर फेकून दिल्याची घटना घडली. यानंतर दोघांनी दुकानादाराला शिवीगाळ व धक्काबुक्की करुन गल्यातील चार हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेतल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर आव्हाड व दिनेश राममहर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी संजय किसन साळवे (४० रा. कवटेकरवाडी, पांडवलेणी) यांनी तक्रार दाखल केली आहे. साळवे यांचा चहा विक्रीचा व्यवसाय असून ते पाथर्डी फाटा परिसरातील उड्डाणपूलाखाली आपली टपरी लावतात.
सोमवारी (दि.२८) सायंकाळी दुकानावर आलेल्या संशयितांकडे साळवे यांनी पैश्यांची मागणी केल्याने ही घटना घडली. चहा आणि सिगारेटचे पैसे मागीतल्याच्या रागातून संतप्त दोघानी साळवे यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करीत गल्यातील चार हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. यावेळी दोघा भामट्यांनी उकळत्या चहासह दुकानातील माल रस्त्यावर फेकून देत मोठे नुकसान केले. अधिक तपास पोलिस नाईक अतुल बनतोडे करीत आहेत.
सातपूरला गुटखा विक्रेत्यावर कारवाई
दुचाकीवरुन गुटखा विक्रीसाठी नेत असतांना पोलीसांनी एकाला ताब्यात घेऊन त्याला गजाआड केले आहे. दुचाकीवरुन हा गुटखा दुकानदारांना पुरवत होता. या संशयिताच्या ताब्यातून दुचाकीसह सुगंधी तंबाखू आणि पानमसाले असा सुमारे ७७ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा गिरीधर कोठावदे (३६ रा. आनंद गार्डन रो हाऊस, श्रमिकनगर) असे संशयित दुचाकीस्वाराचे नाव आहे.
राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची शहरात सध्या कठोर अंमलबजावणी सुरू आहे. सर्वत्र छापेमारी सुरू असल्याने किरकोळसह होलसेल विक्रेत्यांचेही धाबे दणाणले आहेत. तरीही चढ्याभावाने शहरात चोरीछुपी गुटख्याची विक्री सुरूच असून त्यामुळे पोलिसांनी आता वाहतूकदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. नामिशक्कल लढविणा-यांना हुडकून काढले जात असून सोमवारी (दि.२८) वरिल संशयितास रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
श्रमिकनगर येथील गंगासागर नगर भागातून तो दुचाकीवर प्रवास करीत असतांना पोलिसांनी त्यास अडवित तपासणी केली असता तो विक्रीसाठी गुटख्याची वाहतूक करतांना मिळून आला. दुचाकीवरील गोणीत वेगवेगळय़ा प्रकारची सुगंधी तबांखू आणि पान मसाल्याचे पुडे आढळून आले असून या कारवाईत दुचाकीसह गुटखा असा सुमारे ७६ हजार ४२० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत अंमलदार बी.ए.शेजवळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Hot Tea Throw in Shopkeeper