नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वीस फुटी कमानीवर बदनामीकारक फलक झळकविल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा फलक गेल्या गुरूवारी (दि.२९) लावण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावन प्रताप शिंदे उर्फ मुहमंद सुफियान रजा (रा.अमरधामरोड नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गेल्या गुरूवारी ईद निमित्त शहरात अनेक ठिकाणी फलक झळकले होते. संशयितानेही सारडा सर्कल येथील २० फुटी रस्त्यावर महापालिकेच्या कमानीवर फलक लावला होता. या फलकावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेची पडताळणी करून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अंमलदार गणेश शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे.अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.