नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीतील ध्रुवनगर भागात मोबाईल चोरीच्या संशयावरून तिघांनी एकावर प्राणघातक हल्ला केला. या मारहाणीत तरुण जखमी झाला आहे. याघटनेत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दिपक राजेंद्र चव्हाण (साई अव्हेन्यू,ध्रुवनगर) व प्रेम प्रदिप व्याळीज (रा.गोकुळ हाईट,ध्रुवनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. नारायण कांबळे (रा.शिवाजीनगर) हा साथीदार अद्याप फरार आहे.
याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत शुभम किरण राजगुरू (रा. राज्य कर्मचारी वसाहत, मॉडर्न स्कुल जवळ,अशोकनगर) हे जखमी झाले असून त्यांची पत्नी ऋतुजा राजगुरू यांनी तक्रार दाखल केली आहे. राजगुरू शनिवारी (दि.८) रात्री रेन्बो स्कुलचे पाठीमागील नाल्याजवळून जात असतांना संशयित त्रिकुटाने त्यांना गाठले. यावेळी मोबाईल चोरीच्या संशयातून टोळक्याने त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत एकाने धारदार शस्त्राने वार केल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
जुन्या वादाची कुरापत काढून टोळक्याने केली बेदम मारहाण
सातपूर गावात जुन्या वादाची कुरापत काढून टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याच्या घटनेत युवक जखमी झाला असून, याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय मौले,अक्षय मौले, अक्षयचा चुलता,दीपक भंदुरे व मॉन्टी तिडके अशी संशयित हल्लेखोरांची नावे आहेत.
याप्रकरणी विक्रम राजेंद्र सुरवडकर (२३ रा.शिवाजी चौक,सातपूर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. सुरवडकर शनिवारी (दि.८) गौरव चायनिज स्टॉल भागात गेला असता संशयित टोळक्याने गैरकायद्याची मंडळी जमवून, त्यास मागील भांडणाची कुरापत काढून बेदम मारहाण केली. या घटनेत लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने तो जखमी झाला असून, अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.