नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वंजारवाडी येथे जुन्या वादाची कुरापत काढून तिघा बापलेकांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजी अर्जुन शिंदे (४३ रा.वंजारवाडी) यांनी तक्रार दाखल केली असून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात बापलेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने शिंदे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तानाजी किसन सामोरे (६०), सागर तानाजी सामोरे (२०) व अनिल तानाजी सामोरे (२२ रा.सर्व नांदूर, वंजारवाडी शिव) अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. जखमी शिंदे यांना मंगळवारी (दि.३०) रात्री वंजारवाडी येथील भोसले दुध डेअरी परिसरात गाठून बापलेकांनी ही मारहाण केली. मागील भांडणाची कुरापत काढून संतप्त संशयितांनी शिंदे शिवीगाळ करीत लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत शिंदे जखमी झाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिते करीत आहेत.