नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिरावाडीतील शिवकृपानगर भागात दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघाताची कुरापत काढून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत परस्परविरोधी गटातील तिघे जखमी झाले असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल सुनिल अंबारे (रा.शिवकृपानगर,हिरावाडी) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, राम भाळे,ओम बेलारकर,हर्षल गवारे व त्यांचा एक साथीदार यांनी मंगळवारी (दि.२७) शिवकृपानगर रिक्षा स्टॅण्ड परिसरात अंबारे यास अडवून मोटर सायकलला ठोस मारली या कारणातून कुरापत काढून शिवीगाळ व दमदाटी करीत बेदम मारहाण केली. या घटनेत दगड आणि काहीतरी हत्याराचा वापर करण्यात आल्याने अंबारे जखमी झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी हर्षल गवारे यास अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. तर ओम बेलारकर याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, साई अंबारे याने दुपारी बाराच्या सुमारास बेलारकर व मित्र हर्षल गवारे यास त्र्यंबकनगर भागात गाठून दुचाकीस ठोस मारल्याच्या कारणातून कुरापत काढून दोघांना दगडाने मारहाण केली. या घटनेत दोघे मित्र जखमी झाले असून याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक खाजेकर व जमादार वनवे करीत आहेत.