नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – किशोर सुर्यवंशी मार्गावरील जुईनगर भागात किरकोळ कारणाच्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत धारदार शस्त्राचा वापर करण्यात आल्याने दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जावेद इसाक खाटीक (४४ रा.सुरभी अपा.जुईनगर किशोर सुर्यवंशी मार्ग,म्हसरूळ) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शहाबुद्दीन इस्माईल खाटीक , शोएब शहाबुद्दीन खाटीक व शाहरूख शहाबुद्दीन खाटीक (रा.सर्व अश्वमेधनगर,विठाईनगर) आदी नातेवाईकांनी गुरूवारी (दि.२५) रात्री घरी येवून घराच्या कर्जाचे हप्ते वेळेवर का भरत नाही या कारणातून वाद घातला. या वेळी संतप्त त्रिकुटाने शिवीगाळ व दमदाट करीत मारहाण केली.
या हाणामारीत दगडफेक करीत संशयितांनी काही तरी शस्त्राने वार केल्याने जावेद खाटीक जखमी झाले आहेत. तर शहाबुद्दीन खाटीक (६२) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित जावेद खाटीक यास कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्याबाबत समजून सांगत असतांना त्यास राग येवून त्याने शिवीगाळ व दमदाटी करीत काही तरी हत्याराने मारून दुखापत केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अनुक्रमे भोज व गवारे करीत आहेत.