नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट अगरबत्ती चारचाकीतून वाहतूक करणा-या विरुध्द अंबड पोलिस ठाण्यात कॉपीराईट कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश निवृत्ती कापूरे (४० रा.वृंदावन अपा,पाथर्डी फाटा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी मोहम्मद इसरार मोहम्मद इस्लाम शेख (रा. मालाड इस्ट, मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे.
शेख आशिका इसेंस या अगरबत्तीचे अधिकारी असून, नाशिक शहरात राजरोसपणे कंपनीच्या नावे बनावट अगपबत्ती विक्री होत असल्याची माहिती कंपनीस प्राप्त झाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत शेख शुक्रवारी (दि.१६) शहरात दाखल झाले होते. खब-याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना सोबत घेवून कंपनीच्या कर्मचाºयांंनी पाथर्डी फाटा ते अंबड लिंक रोड भागात सापळा लावला असता संशयित पोलिसांच्या हातील लागला.
दुपारी साडे अकराच्या सुमारास संशयित अगरबत्तीचा साठा वितरणासाठी घराबाहेर पडला असता तो पोलिसांच्या जाळयात अडकला. पथकाने एमएच १५ एफव्ही ५९०१ हे वाहन अडवून पाहणी केली असता त्यात सुमारे २ लाख ७९ हजार ५०० रूपये किमतीचा आशिका इसेंस या अगरबत्तीचा बनावट माल आढळून आला. कारसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बर्डे करीत आहेत.