नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटीतील खासगी सावकार असलेल्या दाम्पत्याविरोधात सावकारी नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळ रकमे पेक्षा जास्त रकमेची परतफेड करूनही दहा लाखाची मागणी केल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
शिवीगाळ करीत को-या स्टॅम्प पेपर, धनादेश वर साक्ष-या आणि सदनिकेचे कागदपत्र ताब्यात घेत कर्जदार महिलेच्या पती विरोधात खोटी केस करण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने शहरातील खासगी सावकारीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांचन संदिप चावडा व संदिप जगदिश चावडा (रा. न्यु लुक ब्युटी पार्लर, अनुसयानगर शरदचंद्र पवार मार्केट यार्ड पाठीमागे) अशी बेकायदा सावकारीचा व्यवसाय करणा-या संशयित दांम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी उषा दिपक मकवाना (रा.मधुबन कॉलनी,म.बाद नाका) यांनी तक्रार दाखल केली आहे.
मकवाना दांम्पत्याने २०१७ मध्ये संशयित दांम्पत्याकडून काही रक्कम दहा टक्के व्याजदराने घेतली होती. हा व्यवहार पेठकर प्लाझा या इमारतीत झाला होता. याप्रसंगी साक्षरी केलेल्या धनादेशांसह, स्टॅम्पपेपर आणि सदनिकेचे कागदपत्र संशयितांनी आपल्या ताब्यात घेतले होते. गेल्या सहा – सात वर्षात मकवाना यांनी चावडा यांना मुळ रकमेपेक्षा जास्त रक्कम देवूनही संशयितांनी शिवीगाळ करीत कर्जदार महिलेच्या पतीवर खोटी केस दाखल करण्याची धमकी दिल्याने भेदरलेल्या मकवाना यानी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रोहित केदार करीत आहेत.