नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठेकेदाराकडे दरमहा २० हजार रुपयांची खंडणी मागणा-या वृक्षप्रेमीस पोलिसांनी गजाआड केले. महापालिकेकडे तक्रार न करण्याच्या मोबदल्यात त्याने ही खंडणी मागीतली होती. या व्यवहाराबाबत तक्रारदाराने संशयिताकडून नोटरी बॉण्ड करून घेतल्याने ही प्रकार उघड झाला.
दीपक जाधव असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित खंडणीखोराचे नाव आहे. याप्रकरणी मनपा ठेकेदार नितीन प्रभाकर कोठावदे यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन कोठावदे यांनी नाशिक महापालिकेचे वृक्षतोडीचे टेंडर घेतले आहे. शहरातील बेकायदा वृक्षतोडीबाबत संशयिताने कोठावदे यांना धमकाविले होते. दोघांच्या भेटीअंती या खंडणीची मागणी करण्यात आली. महापालिकेकडे ऑनलाईन तक्रार करायची नसेल तर दरमहिना २० हजार रुपये द्यावे लागतील, असा प्रस्ताव संशयिताने मांडला. यावर कोठावदे यांनी पैसे घेवून तक्रार केली तर असा संशय व्यक्त केल्याने दोघांमध्ये नोटरी बॉण्डवर करार झाला.
याबाबतची एक प्रत हाती पडताच कोठावदे यांनी पोलिसात धाव घेतली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करीत संशयितास अटक केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास गंगापूरचे वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.