नाशिक – शहरात घरफोडीची मालिका सुरूच असून वेगवेगळ्या भागातील तिन ठिकाणची बंद घरांचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सव्वा दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव,म्हसरूळ आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पेठरोडवरील आरटीओ कार्यालयासमोर राहणारे प्रणिल वसंत ठाकरे (रा.नक्षत्र रो हाऊस,शिवसमर्थ नगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ठाकरे कुटूंबिय गेल्या शुक्रवारी (दि.३) मुंबई येथे गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद रो हाऊसच्या हॉल पाठीमागील दरवाजाचे लॉक तोडून बेडरूममधील कपाटातून सोन्याचांदीचे दागिणे,दोन एलईडी टिव्ही, देवांच्या चांदी, पितळाच्या मुर्ती आणि मोबाईल असा सुमारे ६१ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक चतुर करीत आहेत.
दुसरी घटना तपोवन भागात घडली. याप्रकरणी निखील राजाराम ईगल (रा.गोदाई अपा.चव्हाणनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. ईगव कुटूंबिय सोमवारी (दि.६) बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील दहा हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ७ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.
तिसरी घटना नाशिकरोड येथील दत्तमंदिर स्टॉप भागात घडली. याप्रकरणी दिलीप मुरलीधर पाटील (रा.इंदिरा हौ.सोसा.) यांनी तक्रार दाखल केली आहे. पाटील कुटूंबिया दि.२७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे सेफ्टी डोअर आणि मुख्यदरवाजाची कुलपे तोडून ही घरफोडी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील ३५ हजाराची रोकड, कॅमेरा,घड्याळ,चांदीचे ब्रॅस्लेट आणि कडे तसेच सोने चांदीचे खरेदी पावत्या व महत्वाची कागदपत्र असा सुमारे ५० हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार परदेशी करीत आहेत.
……..