नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणार्कनगर भागात धारदार चाकूचा धाक दाखवित दहशत माजविणा-या एकास पोलिसांनी गजाआड केले आहे. या संशयितांच्या ताब्यातून लोखंडी सुरा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार मोहन पगारे ( ३६ रा.साईकृपा रो हाऊस,मातोश्री अपार्टमेंट जवळ,कोनार्क नगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. कोणार्क नगर येथे एक इसम चाकूचा धाक दाखवून दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.२१) धाव घेत पोलिसांनी संशयितास ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे लोखडी चाकू मिळून आला. याबाबत पोलिस शिपाई विलास चारोस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार काटकर करीत आहेत.
चेतनानगर भरदिवसा घरफोडी
भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४६ हजाराच्या मुद्देमाल लंपास केला. ही घरफोडी चेतनानगर भागात झाली. यात रोकडसह मोबाईल व चांदीच्या दागिणे चोरट्यांनी चोरुन नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविंद्र रामदास गायकवाड (रा.सेंट फ्रांसिस स्कूल मागे,सोनवणे मळा) यांनी तक्रार दाखल केली आहे. गायकवाड कुटुंबिय शुक्रवारी (दि.२१) दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे पाठीमागील दार उघडून कपाटातील रोकड व चांदीचे दागिणे तसेच हॉलमध्ये चार्जिंगला लावलेला मोबाईल असा सुमारे ४५ हजार ६०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.