नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा व सत्र न्यायालयाने वाहतूक पोलिसासह वॉर्डनला बेदम मारहाण करून दुकानांची तोडफोड करणा-या चौघांना तीन वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गणेश एकनाथ घोडके (रा. कर्णनगर, पेठरोड, पंचवटी), दीपक हिरामण आहिरे (कामगारनगर, पंचवटी), उमेश रामभाऊ ठोके (ज्वाली कॉम्प्लेक्स, कामटवाडे), किरण दिलीप नागरे (जाणता राजा सोसायटी, पंचवटी) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना २००७ मध्ये वर्दळीच्या सीबीएस चौकात घडली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक वाय. एच. भामरे यांनी करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायालय क्र.१० च्या न्या. मलकापट्टे रेड्डी यांच्यासमोर हा खटला चालला. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता रवींद्र निकम, अपर्णा पाटील यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात दहा साक्षीदार तपासण्यात आले. न्या. रेड्डी यांनी वरिल चार आरोपींना तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एम. ए. पवार, डी. बी. खैरनार यांनी पाठपुरावा केला.
हप्ता वसुलीच्या कारणावरून मारहाण
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मोहन मारुती चांगले याचा २०१३ मध्ये खून झाला तर गिरीश अप्पू शेट्टी (नेहरू चौक, दहीपूल) या संशयिताची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. तत्कालीन वाहतूक पोलिस कर्मचारी रवींद्र पानसरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. २६ फेब्रुवारी २००७ रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास सीबीएस चौकात आरोपींनी धुडगूस घालत हप्ता वसुलीच्या कारणावरून मिलिंद दोंदे याला मारहाण केली.
पानसरे व शेख यांना मारहाण
यावेळी रस्त्याने पेट्रोलींग करणारे पोलिस कर्मचारी पानसरे व वॉर्डन शेख वाद मिटविण्यासाठी गेले असता ही घटना घडली होती. संतप्त टोळक्याने चाकू, वस्तारे, लाठयाकाठया, दांडक्यांसह दोंदे, पानसरे व शेख यांना मारहाण करीत त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेनंतर टोळक्याने टिळकवाडीच्या दिशेने आपला मोर्चा वळवित परिसरातील हातगाडया, बाफना ज्वेलर्स, रेमंड शोरूम, सखी शोरूमच्या काचा फोडून दुकानातील फर्निचरचे नुकसान करीत दहशत माजविली होती.
nashik city crime court punishment police legal