नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नामांकीत कंपनीच्या नावे बनावट कपडे विक्री प्रकरणी शहरातील कापड व्यावसायिकाविरोधात कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कॅल्वीन क्लेन कंपनीचे राकेश राम सावंत (रा. प्रभा देवी, मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे. किशोर खियलदास लालवाणी (रा. होलाराम कॉलनी, मायको सर्कल) असे बनावट कपडे विक्री करणाऱ्या व्यावसायिकाचे नाव आहे.
नाशिक शहरात कॅल्वीन क्लेन कंपनीच्या नावे बनावट कपड्यांची विक्री होत असल्याची माहिती कंपनीस मिळाली होती. त्यानुसार कंपनीच्या वतीने शहरात शोध मोहिम राबविण्यात आली. संशयित लालवाणी यांच्या कानडे मारूती लेन येथील अनंत संकुल मध्ये असलेल्या महादेव होजिअरी दुकानात बनावट कपडे मिळत असल्याची कंपनीला मिळाली. त्यानंतर याप्रकरणी कंपनीने पोलिसांकडे तक्रार केली. सावंत यांच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात मंगळवारी (२० जून) महादेव होजिअरी या दुकानात छापा टाकला. या दुकानात काळ्या, राखाडी व निळ्या रंगाच्या बनावट नाईट पॅण्ट आणि जॉगर्स आढळून आल्या.
संशयित व्यावसायिक हा आर्थिक फायद्यासाठी बनावट कपडे विक्री करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. या कारवाईत सुमारे १४ हजार २५ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भद्रकाली पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पठारे करीत आहेत.