नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात सातत्याने गुन्हेगारी वाढत असून ती रोखण्यात नाशिक पोलिस सपशेल अपयशी ठरत आहेत. खासकरुन सर्वाधिक दाट लोकवस्तीच्या असलेल्या सिडको परिसरात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे. दोन आठवड्यांपूर्वी सिडकोत सकाळच्या सुमारास गोळीबार झाला. त्यामुळे परिसरातील प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले. आणि आता सिडकोत भरदिवसा एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. या खुनाचा उलगडा झाला आहे.
सिडको परिसरात किरकोळ वादातून तरुणाचा खून झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी कसून तपास केला. या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. इंस्टाग्रामवर लाईव्ह करुन शिवीगाळ केल्याच्या कारणातून मित्रांचे भांडण झाले. हे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास करून ९ जण ताब्यात घेतले असून यात ६ जण हे अल्पवयीन आहेत. सिड़को परिसरातील सावता नगर येथे ही घटना घडली आहे.
परशुराम बाळासाहेब नजान हा तरुण सावता नगर येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आला होता. त्यावेळेस त्याच्या सोबत असलेल्या मित्राचे आणि संशयीत यांच्यात इंस्टाग्रामवर वरती लाईव्ह येऊन शिवीगाळ केल्याच्या कारणातून वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. मित्राचे हे भांडण सोडवण्यासाठी परशुराम हा मध्ये पडला त्यामुळे मारहाण करणाऱ्या संशयितापैकी काहींनी रस्त्यात पडलेला पेवर ब्लॉक परशुरामच्या डोक्यात माराला.
या मारहाणीत परशुराम याला गंभीर मार लागल्याने अतिरक्तस्राव झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान परशुराम याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1651154628199972864?s=20
Nashik City Crime Cidco Youth Murder