नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरात गावगुंडांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे. खासकरुन सिडको परिसरात परवा भरदिवसा भाजी विक्रेत्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री गुंडांनी पुन्हा हैदोस घातला. गुंडांनी अनेक वाहनांची तोडफोड केली आहे. याद्वारे गुंडांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
जुन्या सिडको परिसरातील लेखा नगर शॉपिंग सेंटर येथे भरदिवसा भाजी विक्रेत्याची हत्या करण्यात आली. ६ ते ७ जणांच्या टोळक्याने या विक्रेत्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. सपासप वार केल्याने तो जागीच ठार झाला. त्यास काही तास उलटत नाही तोच पोलिसांनी संशयितांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी याच संशयितांची धिंड घटनास्थळावर काढली. हा प्रकार थांबत नाही तोच काही तासांनी म्हणजे शुक्रवारी मध्यरात्री गुंडांनी या परिसरात दहशत माजवली.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अचानक चौक, साईबाबा मंदिर मागील बाजू येथे १५ ते १६ वाहनांची तोडफोड केली. याप्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. तातडीने पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि नाराजीचे वातावरण आहे.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यात दिसून येत आहे की, ४ जणांच्या टोळक्याने हे कृत्य केले आहे. एकाने रस्त्यावरील दगड उचलून थेट चारचाकी वाहनावर जोरात फेकला. त्या कारचे नुकसान झाले. अशाच प्रकारे अन्य वाहनांचीही तोडफोड करण्यात आली आहे. अंबड पोलिस याचा अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, शहरात गुंडागर्दी आणि गुन्हेगारी वाढल्याने नाशिककरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. पोलिसांचा धाक कमी झाला असून राज्य सरकारने याची तत्काळ दखल घेण्याची मागणी होत आहे.
Nashik City Crime Cidco Vehicles Vandalize Police