नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात गुन्हेगारी प्रचंड वाढली असून पोलिसांचा वचक कमी झाला आहे. शहरातील सिडको परिसरात आज भरदिवसा एका भाजी विक्रेत्याची हत्या करण्यात आली आहे. तब्बल ६ ते ७ हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हा हल्ला केला. त्यामुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, याप्रकरणी नाशिक पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या भाजी विक्रेत्याचे नाव संदीप आठवले (वय २२) असे आहे. जुन्या सिडकोतील लेखा नगर येथील शॉपिंग सेंटर चौकात हे हत्याकांड घडले आहे. दुपारी पावणे पाच वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन हल्लेखोर आले. त्यांनी भाजी विक्रेता आठवले याच्यावर धारधार शस्त्राने जोरदार हल्ला केला. पोटात आणि मानेवर जोरदार वार करण्यात आल्याने आठवले याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्याची माहिती मिळताच अंबड पोलिसांचे पथक तसेच गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच, सहायक पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे.
ही हत्या का करण्यात आली, कुणी हा हल्ला केला, पूर्ववमनस्यातून हा हल्ला झाला की अन्य काही कारणे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, शहरात गुन्हेगारी वाढली आहे. सलग तिसऱ्या गुरुवारी सिडको परिसरात हत्या झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. नाशिक पोलिस गुन्हेगारी रोखण्यात सपशेल अपयशी ठरताना दिसत आहेत.
Nashik City Crime Cidco Murder Police