नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कारागृहातून जामिनावर सुटताच गंभीर गुन्हा करणाऱ्या सिडकोतील सराईतास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मारहाणीच्या गुह्यात त्यास मुंबईनाका पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले असून ही कारवाई खंडणीविरोधी पथकाने केली.
साईनाथ उर्फ मॅगी गणेश मोरताटे (१९ रा. भगतसिंग चौक, पवननगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात अंबड व मुंबईनाका पोलिस ठाण्यात मारहाणीसह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. सिडकोतील मारहाणीच्या गुह्यात कारागृहातून गेल्या महिन्यात जामिनावर सुटताच त्याने मुंबई नाका हद्दीतही गंभीर गुन्हा केल्याचे समोर आले आहे. खंडणी विरोधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
बुधवारी (दि.१४) उत्तमनगर येथील जनता विद्यालय भागात तो असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावून त्यास जेरबंद केले असून त्याने मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. पथकाने संशयितास मुंबईनाका पोलिसांच्या स्वाधिन केले असून ही कारवाई खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक प्रविण सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार किशोर रोकडे,पोलिस नाईक योगेश चव्हाण,दत्तात्रेय चकोर,अंमलदार विठ्ठल चव्हाण,स्वप्निल जुंद्रे,चारूदत्त निकम,भुषण सोनवणे,मंगेश जगताप व सविता कदम आदींनी केली.
Nashik City Crime Cidco Criminal Police Arrest