नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रशिया येथील किरगिस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतल असलेल्या मुलांना अल्पदरात विमान तिकीट काढून देण्याच्या मोबदल्यात एकाने पावणे सात लाख रुपयाची फसवणूक केली आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांना सुट्टीत घरी आणण्यासाठी विमान तिकीट देण्याच्या बदल्यात हा गंडा घातला आहे.
तिकीट न मिळाल्याने पालकांनी विचारपूस केली असता संशयिताने शिवीगाळ व दमदाटी केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिक दादाजी पगार (रा.मोरे मळा, रामनगर हनुमानवाडी) असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. याप्रकरणी दिनेश सुभाष खैरणार (रा.आनंदनगर, पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दाखल केली आहे.
खैरणार यांच्या मुलासह शहरातील दहा विद्यार्थी रशिया येथील किरगिस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. मे महिन्यात विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागल्याने खैरनार यांच्यासह उर्वरीत मुलांच्या पालकांनी संशयिताशी संपर्क साधला होता. यावेळी त्याने अल्पदरातील विमान तिकीट मिळवून देण्याची ग्वाही दिल्याने सर्व पालकांनी संशयिताकडे सुमारे ६ लाख ८६ हजार रूपयांची रोकड सुपूर्द केली होती. मात्र सुट्टी संपूनही संशयिताने तिकीटाची तरतुद केली नाही. तीन महिने उलटूनही संशयिताने तिकीट अथवा पैसे परत न केल्याने खैरनार यांनी त्याच्याशी संपर्क केला असता त्याने शिवीगाळ करीत दमदाटी केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास जमादार राजपूत करीत आहेत.