नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– ५० लाखाची रोकड अदा केल्यानंतर सात वर्ष उलटूनही फ्लॅट नावावर करून न दिल्याने दोन जणांविरुध्द पंचवटी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यवहारात बँकेचे कर्ज असतांना सदनिकेची परस्पर विक्री करण्यात आल्याचेही समोर आले आहे. भाऊसाहेब ढगे आणि संदिप शिंदे अशी संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी जिभाऊ रतन सोनवणे (रा.ओमसाई सोसा.सातपूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे यांनी २०१६ मध्ये संशयितांच्या मालकिचा सातपूर येथील साईसृष्टी इमारतीतील फ्लॅटचा व्यवहार केला होता. हा व्यवहार पंचवटीतील अमरधाम भागात राहणा-या हिरवे गुरूजी यांच्या घरात झाला होता. या मोबदल्यात ५० लाखाची रोकड टप्याटप्याने अदा करण्यात आली होती.
मात्र कालांतराने फ्लॅटवर अलाहाबाद बँकेचे कर्ज असल्याचे व फ्लॅट बँकेकडे तारण गहाण असल्याने खरेदीखत करून देण्यात आले नव्हते. लवकरच बँकेचा व्यवहाराची रक्कम अदा करून, खरेदी खत करून देण्याची ग्वाही देण्यात आल्याने सोनवणे यांनी दुर्लक्ष केले होते. मात्र सहा – सात वर्ष उलटूनही संशयितांनी फ्लॅटचे खरेदी खत करून न दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रोहित केदार करीत आहेत.