नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वृध्दाश्रम चालकाची एकाने पावणे दोन लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. गुंठेवारी नुसार घेतलेल्या जमीन व्यवहारातील हा प्रकार आहे, याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे घेवूनही व्यवहार पुर्ण न केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल सदू तालखे (३५ रा.राजूर बहुला) असे फसवणूक करणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण तुकाराम नवसागर (४९ रा. मानवसेवा केअर सेंटर, वृध्दाश्रम निसर्ग कॉलनी, पाथर्डी शिवार) यांनी तक्रार दाखल केली आहे. नवसागर हे वृध्दाश्रम चालवितात. संशयिताने नवसागर यांचा विश्वास संपादन करून वडिलांच्या नावे असलेली जमीन विक्री करावयाची असल्याचे सांगून हा गंडा घातला.
संशयित तालखे आणि नवसागर यांच्यात २०२१ मध्ये राजूर बहुला शिवारातील तालखे यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या २७ गुंठे जमिनीचा व्यवहार झाला होता. ८५ हजार रूपये गुंठा याप्रमाणे व्यवहार ठरल्याने नवसागर यांनी १ लाख ६७ हजार ५०० रूपयांची रक्कम रोख व धनादेशाद्वारे अदा केली. मात्र दीड वर्ष उलटूनही संशयिताने व्यवहार पूर्ण केला नाही तसेच रोकडही परत केली नाही. त्यामुळे नवसागर यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.