नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बांधकाम ठेकेदारास साडे चार लाखास गंडा घातल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाल्यावर संरक्षण भिंत बांधण्याचा ठेका मिळवून देण्याची बतावणी करीत ही फसवणूक करण्यात आली आहे. एक वर्ष उलटूनही काम न मिळाल्याने ठेकेदाराने पोलिसात धाव घेतली आहे. राकेश बापुसाहेब पानपाटील (४० रा.पारितोष अपा.पाईपलाईन रोड) असे बांधकाम व्यावसायीकास गंडविणा-या संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी अजिंक्य बाळासाहेब घुगे (रा.नवपराग सोसा.अशोकस्तंभ) यांनी तक्रार दाखल केली आहे. घुगे यांचा बांधकाम व्यवसाय असून २०२१ मध्ये संशयिताने प्रभाग क्र.६ मधील मखमलाबाद शिवारात असलेल्या नाल्यावर संरक्षक भिंत बांधण्याचा ठेका मिळवून देण्याची बतावणी करीत हा गंडा घातला आहे. हे काम मिळवून देण्याच्या मोबदल्यात संशयिताने ४ लाख ६५ हजारूपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराने टप्याटप्याने ही रक्कम अदा केली असता संशयिताने घुगे यांच्या मोबाईलवर कामाची वर्क ऑर्डर पाठविली. चौकशीत सदरची वर्क ऑर्डर खोटी असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे घुगे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.