नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रद्द झालेल्या कुलमुख्त्यारपत्राच्या आधारे डीड ऑफ डिक्लेरेशन हा दस्त नोंदवून एकाने शासनाने अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फसवणुकीसह भारतीय नोंदणी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल रखमाजी चौघुले (रा. शिवपुजा अपा. लोकमान्यनगर मागे, गंगापूररोड) असे संशयिताचे नाव आहे. २१ डिसेंबर २०११ मध्ये नाशिकरोड येथील सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग २ कार्यालयात एक कुलमुख्त्यारपत्र रद्द झाले होते. त्याचा संशयित चौघुले याने वापर केला. आणि मौजे नाशिक शिवारातील सर्वे नं. ६७४ -२१-२ वरील प्लॉट नं. ६ व ७ या मिळकती बाबत डीड ऑफ डिक्लेरेशन ऑफ हा दस्त नं.१५१४३ -२०११ अन्वये नोंदवले. सदरचे कुलमुखत्यारपत्र रद्द झालेले नाही असे घोषणापत्र देवून मिळकतीचा बेकायदेशीरपणे अपहार केला. याप्रकरणी दस्त नोंदवून शासनाची दिशाभूल व फसवणूक केली. सहाय्यक निबंधक कैलास दवंगे यांनी दिलेल्या आदेशान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी माधव महाले यांनी तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मुन्तोडे करीत आहेत.