नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सहा कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने कारखाना मालकांनी एकास सव्वा कोटींना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट कागदपत्र तयार करून भामट्यांनी अंतरिम मंजूरीसह प्रोसेसिंग फीच्या नावे रोकड स्विकारून ही फसवणुक केली आहे. याप्रकरणी सुनिल मोहन सरोदे (रा.एमएचबी कॉलनी,सातपूर) यांनी तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वजीत उर्फ संजय प्रभाकर चांदोरकर (५४), अनुज विश्वजीत उर्फ संजय चांदोरकर (रा.मिरा भाईंदर,ठाणे) व राम जांबेकर (रा.इंदोर) अशी संशयिताची नावे आहेत.
या फसवणूकीबाबत दिलेली माहिती अशी की, सरोदे यांनी युएलसी गोट फार्मिंग अॅग्रो सर्व्हीसेस या नावाची प्रॉपर्टी फर्म सुरू करून त्यातर्गत व्यवसाय सुरू केला होता. मात्र या व्यवसायात नुकसान झाल्याने हा व्यवसाय डबघाईस गेला. यावेळी संशयितांनी तक्रारदार यांना गाठून व्यवसाय वृध्दीसाठी सरोदे यांचा विश्वास संपादन करून सातपूर औद्योगीक वसाहतीतील अल्ट्रा लाईफ केअर प्रा.लि. या स्व:ताच्या कारखान्याच्या नावे सहा कोटी रूपयांचे कर्ज मिळवून देण्याची ग्वाही दिली.
संशयितांच्या मालकिच्या कारखान्यावर अंतरिम पध्दतीच्या कर्ज मिळवून देत असल्याने सरोदे यांनीही कर्ज उचलण्यास समंत्ती दर्शविली. एप्रिल २०१९ मध्ये याबाबत करार करण्यात आला. त्यानंतर संशयितांनी अंतरिम कर्जाची दोन टक्के रक्कम अदा करावी लागेल असे खोटे सांगून कर्जाची बनावट कागदपत्र तयार करून सरोदे यांच्या कडून १ कोटी २६ लाख ७९ हजार रूपयांची रोकड प्रोसेसिंग फीच्या नावे स्विकारली. चार वर्ष उलटूनही कर्ज अथवा पैसे परत न मिळाल्याने सरोदे यांनी पोलिसांत धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.