नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारी नोकरीचे आमिष दाखवत एकाने महिलेस ३० हजार रूपयांला गंडा घातला. ज्ञानेश्वर पाटील (रा.निफाड) असे महिलेच्या मुलास नोकरीला लाऊन देतो असे सांगणा-य ठकबाजाचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी योगिता संजय बर्वे (रा.हिरावाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. २०२२ मध्ये बर्वे यांची संशयिताशी ओळख झाली होती. यावेळी त्याने आपल्या मोठ्या ओळखी असल्याचे भासवून महिलेच्या मुलास नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. १४ नोव्हेंबर रोजी संशयिताने महिलेस पाथर्डी फाटा परिसरातील सिग्नस हॉस्पिटल भागात बोलावून घेत तिच्याकडे पैश्याची मागणी केल्याने महिलेने ३० हजार रूपयांची रक्कम स्वाधिन केली होती. मात्र सहा सात महिने उलटूनही नोकरी न लागल्याने महिलेने पैश्यांसाठी तगादा लावला असता संशयिताने टोलवाटोलवी केल्याने महिलेने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
फोन करुन ९७ हजार लुटले
क्रेडिट कार्डवरून ऑनलाईन डेबिट करीत भामट्यांनी ९७ हजार परस्पर वर्ग केले. क्रेडिट कार्डची गोपनिय माहिती मिळवीत हा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी राहूल नितीन टेकाळे (३१ रा.मंगलनगर,गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेकाळे यांच्याशी गेल्या २५ मार्च रोजी भामट्यांनी ६२३९६४२९३९ या क्रमांकावरून संपर्क साधला होता. यावेळी आयसीआयसीआय बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवून टेकाळे यांच्या क्रेडीट कार्डची माहिती भामट्यांनी मिळवली. या नंतर दोन दिवसांच्या कालावधीत क्रेडिट कार्डवरून ९७ हजाराची रक्कम परस्पर ऑनलाईन डेबिट करण्यात आली. ही बाब निदर्शनास येताच टेकाळे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक बंडेवाड करीत आहेत.