नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील एका गुंतवणुकदारास मुंबईच्या दाम्पत्याने साडे तीन कोटीचा गंडा घातला आहे. ट्रेंडिगमधील गुंतवणुकीवर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी अतुल सोहनलाल शर्मा (६६ रा.सिरीन मेडोज, गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुजा विशांत भोईर (३२) व विशांत विश्वास भोईर (३५ रा.खडकपाडा, कल्याण) असे ठकबाज दाम्पत्याचे नाव आहे. भोईर दाम्पत्याची शर्मा यांच्याशी गेल्या जून महिन्यात बॉईज टाऊन स्कूल भागात भेट झाली होती. यावेळी दाम्पत्याने शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतील नफ्याचे महत्व पटवून देत ट्रेंडिगमधील गुंतवणुकीवर भरघोस नफा मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे शर्मा यांनी भोईर दाम्पत्यावर विश्वास ठेवत तब्बल साडे सहा कोटीहून अधिक रक्कम संशयितांच्या माध्यमातून गुंतवणुक केली होती.
त्यातील काही रक्कम परत करीत या दाम्पत्याने सुमारे ३ कोटी ५१ लाख रूपयांहून अधिक रक्कम परत न करता तिचा स्व:ताच्या आर्थिक फायदा करून घेवून अपहार केल्याचे शर्मा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक रवी मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रूपेश केदार करीत आहेत.