नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एमबीबीएसला शासकिय कोट्यातून अॅडमिशन मिळवून देण्याचे सांगत परराज्यातील एकाने शहरातील पालकास एक लाख रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोषकुमार हरिचंद्र पाणीग्रही (रा.बीसीरोड, जयकापूर रायगडा, ओरिसा) असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण हनुमंत तांबोळी (रा. विक्रीकर भवन जवळ, पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दाखल केली आहे. तांबोळी यांच्या मुलीचा वैद्यकीय शिक्षणासाठी प्रयत्न सुरू होता. तांबोळी कुटुंबिय विविध ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांची माहिती घेत असतांना संशयित त्यांच्या संपर्कात आला.
एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणास शासकिय कोट्यातून अॅडमिशन करून देतो अशी बतावणी करीत त्यांच्याकडून एक लाख रूपये उकळले. ही रक्कम गेल्या वर्षी सप्टेबर महिन्यात स्विकारण्यात आली होती. अनेक दिवस उलटूनही तांबोळी यांच्या मुलीचा कुठेही नंबर लागला नाही. त्यामुळे संशयिताकडे पैश्याचा तगादा लावला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.