नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मंगळसूत्र ओरबाडणा-या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. योगेश दामू कडाळे (२० रा. तानाजी चौक, शिंपी समाज मंगल कार्यालयाजवळ, सिडको) व विशाल परशराम आवारे (१९ रा. बडदेचाळ, शिवाजी चौक, सिडको) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना मे २०१७ मध्ये पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल चांगल चुंगले भागात घडली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी मंगला रमाकांत शिरोडे (रा. विक्रीकर भवन, पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दाखल केली होती. शिरोडे दांम्पत्य ८ मे २०१७ रोजी रात्री उंटवाडी येथे भावाकडे गेले होते. रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास दोघे पती पत्नी पाथर्डी फाट्याच्या दिशेने आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली होती. दामोदर चौकातून पाथर्डी फाट्याकडे जात असतांना चांगल चुंगल हॉटेल भागातील खदान पुल परिसरात दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी शिरोडे यांच्या गळ्यातील सुमारे २७ ग्रॅम वजनाचे व ५४ हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र ओरबाडून नेले होते.
याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ तत्कालीन सहाय्यक निरीक्षक डी.व्ही.गिरमे यांनी या गुह्याचा तपास केला. दोघा आरोपींना बेड्या ठोकत न्यायालयात पुराव्यानिशी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
प्रथम वर्ग न्यायालय क्रमांक ३ चे न्या. जी. एम. कोल्हापुरे यांच्या समोर हा खटला चालला. सरकार तर्फे अॅड. एस. एम. वाघचौरे आणि एस. एस. चिताळकर यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेले पुराव्यानिशी पुराव्यास अनुसरून दोघा आरोपींना जबरीचोरीच्या गुह्यात दोन वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.