नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात शनिवारी (दि.२५) वेगवेगळ्या भागात दोन महिलांच्या गळयातील मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी आडगाव आणि मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना त्र्यंबकरोडवरील जिल्हा रूग्णालय परिसरात घडली. लता बळवंत सोनवणे (रा.संगमेश्वर मालेगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे या शनिवारी नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात आल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्या ठक्कर बाजार बसस्थानक येथून सिडकोतील उत्तमनगर भागात जाण्यासाठी जिल्हारूग्णालयासमोरील बस थांब्यावर थांबल्या असता ही घटना घडली. पंचवटी उत्तमनगर बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे ८० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हातोहात लांबविले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बहिरम करीत आहेत.
दुसरी घटना ओढा गावात आठवडे बाजारात घडली. येथील निलेश मधुकर चव्हाण यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी ओढा गावात आठवडे बाजार होता. भाजीपाला खरेदी करण्यासाठी चव्हाण यांच्या आई बाजारात गेल्या असता ही घटना घडली. गर्दीत भाजीपाला खरेदी करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ६९ हजार २४० रूपये किमतीचे मंगळसूत्र हातोहात लांबविले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
Nashik City Crime Chain Snatching Police Womens