नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने विनापरवानगी पिस्तूल बाळगणा-या बांधकाम व्यावसायिकास गजाआड केले आहे. त्याच्या ताब्यातून गावठी कट्यासह जीवंत काडतुसे जप्त केले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात शस्त्रबंदीसह हद्दपार आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयेश उर्फ भोला सुरेश अहिरे (३० रा.सदगुरू अपा. रामदास स्वामी नगर, लेन.नं.२, गांधीनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक असलेल्या भोला अहिरे याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याच्याविरोधात हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. शहर आणि जिह्यातून त्यास हद्दपार केलेले असतांना त्यांचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. उपनगर पोलिस त्याच्या मागावर असतांनाच दरोडा व शस्त्र विरोधी पथकाचे हवालदार विजयकुमार सुर्यवंशी आणि अंमलदार महेश खांडबहाले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
संशयित गावठी कट्टा घेवून येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने धाव घेत त्यास उपनगर पोलिस ठाणे हद्दीत जेरबंद केले. संशयिताच्या अंगझडतीत देशी बनावटीचा गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे व एक काडतुसाची पुंगळी मिळून आली असून याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पथकाचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक किरण रोंदळे,हवालदार विजयकुमार सुर्यवंशी,पोलिस नाईक मोहन देशमुख,अंमलदार महेश खांडबहाले,संदिप डावरे,विशाल जोशी,मनिषा कांबळे आदींच्या पथकाने केली.