नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोड भागात दारू आणून देण्यास नकार दिल्याने टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी संदिप शिवाजी साबळे (३६ रा. आर्चिड पॅराईड, गायकवाड मळा) यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक संपत साबळे (रा.गायकवाडमळा,ना.रोड), तुषार सुर्यवंशी, हर्षेल मुळे व पवन पिंगळे अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. साबळे सोमवारी (दि.२६) कॉलेजरोड भागात आले होते. मॉडेल कॉलनीतील क्वालिटी सुपर मार्केट भागातून ते जात असतांना नंदन स्वीट दुकानासमोर असलेल्या टोळक्याने त्यांना गाठले.
यावेळी संशयितांनी त्यांना दारू आणण्यासाठी सांगितले. मात्र साबळे यांनी नकार दिल्याने ही हाणामारी झाली. या घटनेत टोळक्याने लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याने ते जखमी जाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.