नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सहवासनगर भागात जुन्या वादाची कुरापत काढून २७ वर्षीय तरूणास मायलेकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत काही तरी हत्यार व लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघा भावांना पोलिसांनी अटक केली आहे.
आकाश दिलीप गांगुर्डे (१८),प्रकाश दिलीप गांगुर्डे (२१) व भिमाबाई दिलीप गांगुर्डे (४७ रा.तिघे सहवासनगर) अशी तरूणास मारहाण करणा-या संशयितांची नावे असून त्यातील आकाश व प्रकाश गांगुर्डे या दोघा भावांना गजाआड करण्यात आले आहे. याप्रकरणी सनी सुधाकर माळी (२७ रा.नवीन एलआयसी ऑफिसजवळ,सहवासनगर,गडकरीचौक) या युवकाने तक्रार दाखल केली आहे.
माळी हा सोमवारी (दि.१९) परिसरातील सार्वजनिक शौचालय भागात गेला असता ही घटना घडली. संशयित मायलेकांनी त्यास गाठून जुन्या वादाची कुरापत काढून शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी संतप्त मायलेकांनी त्यास काही तरी हत्यार आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याने माळी जखमी झाला असून पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.अधिक तपास पोलिस नाईक ठिगळे करीत आहेत.
मुलास मारहाण नंतर महिलेचा विनयभंग
चेतनानगर भागात मुलास मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेचा एकाने विनयभंग केल्याची घटना घडली.संतोष रामलाल गुप्ता (रा.मधुरा अपा.बाजीराव आव्हाड चौक) असे महिलेचा विनयभंग करणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आणि पीडिता एकाच भागातील रहिवासी असून, पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी (दि.१९) साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संशयिताने पीडितेच्या मुलास मारहाण केली होती. त्यामुळे महिला जाब विचारण्यासाठी संशयिताच्या घरी गेली असता त्याने अश्लिल शिवीगाळ करीत महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.