नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून जेलरोडवरील बँक ऑफ बडोद्याच्या शाखेत एकाने आई व मुलाला दोन लाखाला गंडा घातला. बोलण्यात गुंतवत नंतर थम्बपॅड आणण्यास सांगून ही रक्कम या भामट्याने लंपास केली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व चोरी बँकेचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रीत झाली असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
नाशिक पुणे महामार्गावरील जुना आशीर्वाद बस थांब्याजवळील बँक ऑफ बडोदा शाखेत जेलरोड परिसरात राहणारे अंकुर लाटे हे त्यांची आई लिलाबाई सोमनाथ लाटे यांच्यासोबत गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दोन लाखाची रक्कम भरण्यासाठी बँकेत गेले होते. हा भरणा करतांना अंकुरने दोन लाखांची रोकड बँकेच्या कॅशियरसमोर काउंटरवर ठेवली.
त्याचवेळी बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवत आलेल्या एका इसमाने अंकुरला थम्बपॅड आणण्यास सांगताच अंकुर बाजूला गेला आणि हिच संधी साधत अज्ञात व्यक्तीने कॅशियरसमोर ठेवलेली रोख रक्कम लंपास केली. त्यानंतर त्याने पोबारा केला.