नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपनगर परिसरातील शांतीपार्क भागात जेवण आटोपून चौकात बसलेल्या तरूणावर एकाने चाकू हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत २० वर्षीय तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी साहिल दामोधर खैरनार (रा.साई प्लाझा अपा.रामदास स्वामी नगर लेन.नं.२ उपनगर) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुश डांगळे (रा. कांडप यंत्राजवळ,शांती पार्क उपनगर) असे तरूणावर चाकू हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे. खैरनार रविवारी (दि.२) रात्री जेवण आटोपून चौकात गेले असता ही घटना घडली. शांती पार्क येथील तिरूपती किरणा दुकानासमोरील कट्यावर तो बसलेले असतांना संशयिताने त्यास गाठले. यावेळी डांगळे याने विनाकारण शिवीगाळ केल्याने खैरनार याने त्यास जाब विचारला असता ही घटना घडली. संतप्त संशयिताने कमरेला लावलेला धारदार चाकूने खैरनार यांच्यावर हल्ला केला. या घटनेत पाठीवर वार करण्यात आल्याने खैरनार जखमी झाला असून अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.
जेलरोडला गुटखा विक्रेता गजाआड
गुटखा विक्री करणा-या विक्रेत्याला पोलिसांनी गजाआड करुन त्यांच्या ताब्यातून दहा हजाराच्या रोकडसह सुमारे १ लाख ३५ हजार रूपये किमतीचा प्रतिबंधीत गुटखा हस्तगत केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिध्दांत विजय जाधव (३५ रा.सिंधू बंगला,ब्रम्हगिरी हौ.सोसा. भिमनगर जेलरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
जाधव गुटख्याची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.३) त्याच्या घर परिसरात सापळा लावण्यात आला होता. जाधव पिशवी घेवून घराबाहेर पडताच पोलिसांनी त्यास पकडून झडती घेतली असता त्याच्या खिशात दहा हजाराच्या रोकडसह पिशवीत विविध नावांची तंबाखू व पान मसाल्याचे पुडे मिळून आले. संशयिताच्या घराच्या झडतीत गुटख्याने भरलेल्या गोण्या मिळून आल्या असून या कारवाईत १ लाख ३५ हाज ९३५ रूपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याबाबत हवालदार देवकिसन गायकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक गोळे करीत आहेत.