नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळा पाथर्डी मार्गावरील आयसीआयसीआय बँक परिसरातील होंडा शोरूम सिग्नल भागात एक अपघात झाला आहे. धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५८ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. रविंद्र अंबादास विभांडीक (५८ रा. वरद बंगला, एकमुखी दत्तमंदिर, चेतनानगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विभांडीक सोमवारी (दि.१०) सकाळच्या सुमारास वडाळा पाथर्डी रोडने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. घराकडे जात असतांना त्यांना धावत्या दुचाकीवर भोवळ आल्याने ही घटना घडली. आयसीआयसीआय बँक परिसरातील होंडा शोरूम सिग्नल भागात ते दुचाकीवरून पडले. यात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने पुतण्या हेमंत विभांडीक यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास उपनिरीक्षक हादगे करीत आहेत.
दुचाकी दुभाजकावर आदळल्याने युवक ठार
त्र्यंबकरोडवरील पिंपळगाव बहुला शिवारात भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात २४ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अमान इलियाज पठाण (२४ रा.पिंपळगाव बहुला) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पठाण रविवारी (दि.९) रात्री आपल्या ज्युपिटर दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली.
नाशिककडून त्र्यंबकरोडने तो पिंपळगाव बहुलाच्या दिशेने भरधाव जात असतांना दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने वडिल इलियाज पठाण यांनी त्यास तात्काळ अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे दाखल केले असता दुस-या दिवशी सायंकाळी उपचार सुरू असतांना डॉ.शेखर चेमाडे यांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक वाघमारे करीत आहेत.