नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरी भागात भरधाव दुचाकी घसरल्याने ३४ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. पंकज रामधारी प्रसाद (३४ रा.मटालेचाळ,मोदकेश्वर मंदिराजवळ,कामटवाडे) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज प्रसाद गेल्या रविवारी (दि.१६) त्र्यंबकरोडने आपल्या अॅक्टीव्हा दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. पपया नर्सरी परिसरातील श्री कलावती हॉस्पिटल समोर भरधाव दुचाकी घसरल्याने ते जखमी झाले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार मुसळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करीत आहेत.
नाशिक शहरात आणखी दोघांची आत्महत्या
शहरात गुरूवारी वेगवेगळया भागात राहणा-या दोन जणांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर व सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना औद्योगिक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. आनंदा जगन्नाथ डहाळे (४८ रा.आयटीआय कॉलनी,श्रमिकनगर) यांनी गुरूवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता.त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कृष्णा शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भड करीत आहेत.
दुस-या घटनेत दशरथ नागेश कांबळे (२८ रा.अक्षय ज्योत अपा.मातोश्रीनगर) या तरूणाने गुरूवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी १०८ अॅम्बुलन्सला बोलावले असता अॅम्बुलन्स वरील डॉ.प्रविण जोशी यांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत रविंद्र मरसाळे यांनी दिलेल्या खबरीवरून उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.