नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबाद – नाशिक मार्गावर चारचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याचे वृत्त आहे. भाऊलाल चिंधू सानप (४७ रा. सिध्दीविनायक अपा.मखमलाबाद शाळा जवळ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सानप गेल्या २८ मे रोजी मखमलाबाद कडून नाशिकच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. पुढे जाणा-या चारचाकीच्या विचित्र अपघातात सानप जखमी झाले होते. या अपघातात त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने नातेवाईक अमोल धात्रक यांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. १० जून रोजी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत.
५२ वर्षीय व्यक्तीची राहत्या घरात आत्महत्या
५२ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना मखमलाबादरोडवरील शिंदेनगर भागात घडली. दुष्यंतकुमार रामचरणदास दयाल (रा.साईनिवास बंगला, स्वामी जनार्दन नगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दयाल यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दयाल यांनी शुक्रवारी (दि.७) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचन रूममध्ये छताच्या हुकाला लुंगी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलगा कार्तिक दयाल यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार वाघमारे करीत आहेत.