नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पुणे मार्गावर मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झालेल्या २१ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. हरिप्रिया संजय पुरोहित (रा.साईअंगण अपा.सरस्वतीनगर,हिरावाडीरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. खासगी रूग्णालयात त्यास दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुरोहित गेल्या १५ मे रोजी रात्री आपल्या दुचाकीने नाशिकरोडकडून पंचवटीच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. नाशिक क्लब भागात दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाल्याने पुरोहित गंभीर जखमी झाला होता. या घटनेत त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने मित्र राजन शहा यांनी त्यास तात्काळ अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले असता बुधवारी (दि.२४) वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले.
२५ वर्षीय युवकाची आत्महत्या
औद्योगीक वसाहतीतील महालक्ष्मीनगर भागात २५ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. राकेश छोटू देवरे (२५ रा. समाज मंदिर जवळ, महालक्ष्मी नगर) असे मृत युवकाचे नाव आहे. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राकेश देवरे या युवकाने बुधवारी (दि.२४) आपल्या राहते घराच्या दुस-या मजल्यावरील हॉलमध्ये अँगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मावस भाऊ किरण वणीस यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार टेपले करीत आहेत.