नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील हॉटेल न्यु प्रताप समोर भरधाव आयशरने दिलेल्या धडकेत २० वर्षीय दुचाकीस्वार तरूण ठार झाल्याची घटना घडली. सुर्यकांत सुभाष महाले (२० रा.मावडी ता.दिंडोरी) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात पसार झालेल्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात दुचाकीवरील अन्य दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाले व त्याचे दोन मित्र शनिवारी (दि.३) दुचाकीवर ट्रिपलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. नाशिककडून ओझरच्या दिशेने जाणा-या दुचाकीस पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १५ डीके २५४१ या आयशर ट्रकने धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक महाले याचा मृत्यू झाला तर त्याचे दोन मित्र जखमी आहेत. याबाबत पोलिस शिपाई योगेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बनकर करीत आहेत.
कलानगरमध्ये चौथ्या मजल्यावरुन पडल्याने कामगाराचा मृत्यू
दिंडोरीरोडवरील कलानगर भागात काम करीत असतांना चौथ्या मजल्यावरून पडल्याने ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. उमेश रमेश पाटील (३२ रा.गुणाई रो हाऊस,सिहस्थनगर,मोरवाडीगाव सिडको) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाटील सोमवारी (दि.३) निलेश रंगानी यांच्या हरी ओम कन्स्ट्रक्शन प्लाझा या बांधकाम साईटवर काम करीत असतांना ही घटना घडली. पाटील सायंकाळच्या सुमारास चौथ्या मजल्यावर काम करीत असतांना अचानक तोल गेल्याने ते जमिनीवर कोसळले होते. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने भाचा कल्पेश पाटील याने तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार वाघ करीत आहेत.