नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – म्हसरूळ – वरंवडी मार्गावर भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. रोहित रतन कडाळे (२२) व रोशन वसंत चौधरी (१७ रा.दोघे शिवाजी पवार विटभट्टी,हरिओम नगर पेठरोड) अशी मृत दुचाकीस्वारांची नावे आहेत. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
कडाळे व चौधरी हे दोघे बुधवारी (दि.२६) सायंकाळी वरवंडी कडून म्हसरूळच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. डगळे वस्ती परिसरात भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने कडाळे याचा जागीच मृत्यू झाला तर चौधरी गंभीर जखमी झाला होता. या दोघांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिस शिपाई पारधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मृत चालकाविरूध्द अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आहिरे करीत आहेत.
किरकोळ कारणाची कुरापत काढून एकास बेदम मारहाण
सिडकोतील साईबाबानगर भागात किरकोळ कारणाची कुरापत काढून टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत दगड विटांचा वापर करण्यात आल्याने तक्रारदार इसम जखमी झाला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश कुरे, विजय नावडे,बगळ््या व अन्य तीन साथीदार अशी मारहाण करणाºया संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी रामसिंग हिम्मतसिंग राजपूत (५४ रा.अक्षर कॉलनी,कृष्णानगर चेतनानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. राजपूत बुधवारी (दि.२६) रात्री सिडकोतील साईबाबानगर भागात गेले असता ही घटना घडली. मनपाचे मोकळे ग्राऊंड जवळील पान टपरीवर ते उभे असतांना संशयित टोळक्याने दुचाकीवर थुंकण्याची कुरापत काढून त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी संतप्त टोळक्याने विटा दगडांनी मारहाण केल्याने राजपूत जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.