नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुक्तीधाम परिसरातील मस्जीद समोर भरधाव दुचाकीच्या अपघातात ६३ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. दिनकर धोंडीराम ताजनपुरे (६३ रा. ताजनपुरे मळा, चेहडी ना.रोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ताजनपुरे सोमवारी (दि.३१) मुक्तीधाम समोरून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. परिसरातील मस्जीद समोर दुचाकीचा अपघात झाल्याने ते पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास व छातीस मार लागल्याने कानातून रक्त आले होते. बेशुध्द अवस्थेत त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉ. रत्नाकर पगारे यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक देवरे करीत आहेत.
एकाच्या डोक्यात दारुची बाटली फोडली
औद्योगिक वसाहतीतील जुन्या भांडणाची कुरापत काढून एकाने ३९ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. ही घटना विशाल वाईन्स शेजारील देशी दारू दुकान परिसरात घडली. या घटनेत सदर इसम जखमी झाला असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी शंकर शेट्टी (रा.चुनाभट्टी,उंटवाडी) असे दुस-याच्या डोक्यात दारूची बाटली फोडणा-या संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी कृष्णा हिरामण बोंबले (रा.बोंबले मळा,सपना टॉकीज मागे,बडदे नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. बोंबले रविवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास औद्योगीक वसाहतीतील विशाल वाईन्स दुकान परिसरात गेले असता ही घटना घडली. देशी दारू दुकानासमोर भेटलेल्या संशयिताने त्यांच्याशी जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद घातला. यावेळी बोंबले समजून सांगत असतांना संशयिताने दारूची बाटली त्यांच्या डोक्यात फोडली. या घटनेत बोंबले जखमी झाले असून अधिक तपास पोलिस नाईक महाजन करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten