नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोटमगाव हिंगवणे मार्गावर ऊसाच्या बांड्यानी भरलेल्या टेम्पोने दिलेल्या धडकेत २१ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. आशिश जयराम वलवे (२१ रा.गंगापाडळी पो.लाखलगाव ता. जि.नाशिक) असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात टेम्पो चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वलवे रविवारी सायंकाळच्या सुमारास कोटमगाव हिंगवणे मार्गाने आपल्या इलेक्ट्रीक दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. ऊसाच्या बांड्या भरून पाठीमागून भरधाव आलेल्या टेम्पोने दुचाकीस धडक दिली. अपघात इतका भयंकर होता, की दुचाकीसह रस्त्यावर पडलेल्या वलवे याच्या डोक्यावरून टेम्पोचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेत दुचाकीचाही चक्काचुर झाला असून याबाबत शुभम वलवे (रा.लाखलगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून टेम्पो चालक रामेश्वर विक्रम राठोड (रा.सोमवार बाजार, देवळाली कॅम्प) यांच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.
उड्डाणपूलावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्ध ठार
उड्डाणपूलावर भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ७८ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाले. जयप्रकाश जयकिसन जाजू (७८ रा.जाजू गल्ली, तानाजी चौक, ओझर) असे मृत वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जाजू गेल्या शुक्रवारी (दि.१९) दुपारच्या सुमारास ओझर कडून नाशिकच्या दिशेने आपल्या अॅक्टीव्हा दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. दत्तमंदिर परिसरातील उड्डाणपूलावर अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने वृध्द जाजू जखमी झाले होते.
कुटुंबियांनी त्यांना तात्काळ नजीकच्या मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यांनतर त्यांना पुन्हा त्रास होवू लागल्याने कुटुंबियांनी त्यांना धाडिवाल रूग्णालयात दाखल केले असता सोमवारी (दि.२९) उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस नाईक बनकर करीत आहेत.