नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने नाशिक परिसरातील नानावली आणि नाशिकरोड परिसरातील सात जुगारींना पोलिसांनी गजाआड करुन त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहेत. या कारवाईत याप्रकरणी भद्रकाली आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात जुगार बंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नानावली परिसरातील फेमस बेकरी भागात जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.८) रात्री पोलिसांनी छापा टाकला असता सचिन देवकर,सादिक शेख, साजिद खान, संदिप जोशी व अशपाक शेख आदी फेमस बेकरी समोरील मोकळया जागी उघड्यावर पत्यांच्या कॅटवर तीन पानी जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून एक हजार ४९० रूपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी शिपाई हासे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक शेळके करीत आहेत.
दुसरा छापा नाशिकरोड येथील मिना बाजार भागात टाकण्यात आला. रिक्षा स्टॅण्डवरील मोकळया जागी आनंद निरभवणे व योगेश भिंगारदिवे हे दोघे अंक अकड्यावर कल्याण नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून ८९० रूपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस कर्मचारी सोमनाथ जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार शिंदे करीत आहेत.