नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळ्या भागात छापे मारी करीत पोलिसांनी शहरात बेकायदा दारू विक्री करणा-या तीन दारू विक्रेत्यावर कारवाई केली. या कारवाई सुमारे साडे सात हजार रूपये किमतीचा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी सातपूर व नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सातपूर येथील प्रबुध्दनगर भागात बेकायदा मद्यविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी पोलिसांनी धाव घेतली असता अमोल अंकुश खाडे (३५ रा. महालक्ष्मी चौक प्रबुध्दनगर) हा घर परिसरातील एका दगडी भिंतीच्या आडोश्याला दारू विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून सुमारे ३ हजार ९०० रूपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी अंमलदार सागर गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.
दुसरी कारवाई एकलहरा रोडवरील देशमुखवाडी भागात करण्यात आली. दादा कौतीक जोंधळे (४२ रा.देशमुखवाडी) हा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारा मोकळया जागेतील एका झाडाखाली दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून ९८० रूपये किमतीच्या संत्रा नामक देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून संशयितास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिपाई केतन कोकाटे यांनी तक्रार दिली आहे.
तिसरी कारवाई चेहडी पंपीग येथील मराठा नगर भागात करण्यात आली. विकास विलास गवई (२७ रा.प्रथमेश चायनीज कॉर्नर जवळ,मराठानगर) हा शुक्रवारी सायंकाळी ग्रीन मॅटच्या पडवीलगत दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे २ हजार ४८५ रूपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली. याप्रकरणी पथकाच्या सुमन साबरे यांनी तक्रार दाखल केली असून दोन्ही घटनांप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास हवालदार काकड व पोलिस नाईक पाटील करीत आहेत.