नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्यांच्या कॅटवर जुगार खेळणा-या चार जणांवर पोलिसांनी अमृतधाम भागात कारवाई केली. या कारवाईत संशयितांच्या ताब्यातील रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे १ हजार ३२० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक दत्तू साळवे (रा.फुलेनगर), संदिप विठ्ठल अडांगळे (रा.जेलरोड), गणेश काशिनाथ नाईक (रा.हिरावाडी) व संजय नारायण मोरे (रा.जत्रा हॉटेल जवळ) अशी संशयित जुगारींची नावे आहेत. अमृतधाम येथील अकबरभाई एन्टपप्रायझेस भागात जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार मंगळवारी (दि.६) सायंकाळी पथकाने धाव घेत छापा टाकला असता संशयित पत्यांच्या कॅटवर अंदर बाहर जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य असा सुमारे एक हजार ३२० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस शिपाई कुणाल पचलोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक गुंबाडे करीत आहेत.
पोस्ट ऑफिस भागात जनरेटरची बॅटरीची चोरी
जनरल पोस्ट ऑफिस भागात जनरेटरची बॅटरी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. संदेश सुरेशदास बैरागी (रा.उत्तरानगर ,द्वारका) यांनी तक्रार दाखल केली आहे. जनरल पोस्ट ऑफिसच्या आवारातील भिंती लगत बसविलेली सुमारे पाच हजार रूपये किमतीची जनरेटरची बॅटरी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना गेल्या २४ मे रोजी रात्री घडली. अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत.