नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथील प्रथम वर्ग न्यायालयाने महापालिकेचा टाऊन हॉल फोडून लोखंडी खुर्चींच्या प्लेटा चोरणा-या चोरट्यास दोन वर्ष १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. अर्जुन खंडू म्हस्के (२२ रा.खालची पेठ, इगतपुरी ता. इगतपुरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २०२१ मध्ये घडली होती. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक तेजल पवार यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप न्यायालयात सादर केले होते. हा खटला नाशिकरोड येथील प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्या.शर्वरी जोशी यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे सहाय्यक अभियोक्ता एस.पी.घोडेस्वार यांनी बाजू मांडली असता न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकाºयांनी सादर केलेले पुराव्यास अनुसरून न्यायालयाने आरोपीस दोन वर्ष व पंधरा दिवसांचा कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
दहा हजाराच्या प्लेटा चोरून नेल्या
महापालिकेच्या महात्मा गांधी सभागृहाचा लाकडी दरवाजा तोडून ५ ऑगष्ट २०२१ रोजी ही घरफोडी करण्यात आली होती. सभागृहातील ११५ लोखंडी खुर्च्यांच्या सुमारे दहा हजार रूपये किमतीच्या प्लेटा चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा शोध घेऊन पोलिसांनी आरोपीला गजाआड केले होते.